Jump to content

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT (चर्चा | योगदान)द्वारा २०:०७, १२ डिसेंबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
उदयोन्मुख लेख
हा लेख २२ जुलै, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख
गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स
विकासक स्टारडॉक
प्रकाशक स्टारडॉक
पॅरॅडॉक्स इंटरॅक्टिव्ह
रचनाकार ब्रॅड वार्डेल
इंजिन लिबथ्रीडी, क्युमक्वात
प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट विंडोज
प्रकाशन दिनांक फेब्रुवारी २१, इ.स. २००६
नवीनतम आवृत्ती १.५३.१३६
खेळण्याचे प्रकार एक-खेळाडू
मूल्यांकन इएसआरबी: इ१०+
पीईजीआय: ३+
माध्यमे/वितरण सीडी, उतरवणे
प्रणाली आवश्यकता

विंडोज ९८ / एमई / २००० / एक्सपी

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स (इंग्रजी: Galactic Civilizations II: Dread Lords, लघुनाम GalCiv II किंवा GalCiv2) हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे. तो उत्तर अमेरिकेत फेब्रुवारी २१, इ.स. २००६ रोजी प्रकाशित झाला. त्याचे पहिले विस्तारक[श १] , डार्क अवतार फेब्रुवारी, इ.स. २००७ मध्ये प्रकाशित झाले. दुसरे विस्तारक, ट्वायलाइट ऑफ द आर्नोर हे एप्रिल, इ.स. २००८ मध्ये प्रकाशित झाले.

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ची कथा तेविसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर घडते, जेव्हा अनेक ग्रहांवरील (पृथ्वीसहित) जीव हे थोडे-थोडे ग्रह जिंकत संपूर्ण आकाशगंगा बळाने, कूटनीतीने, प्रभावाने आणि तंत्रज्ञानाने जिंकून घेण्यासाठी धडपड करत असतात. हा खेळ एक-खेळाडू अनुभवाला लक्ष्य करतो. यात एक "कॅंपेन" हा खेळण्याचा प्रकार व एक "सॅंडबॉक्स" खेळण्याचा प्रकार आहे. हा खेळ त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे[श २] उल्लेखनीय आहे. या खेळाला सामान्य व्यावसायिक यश लाभले व त्याने अनेक "एडिटर्स चॉइस" पुरस्कार मिळवले. स्टारडॉकने एक वेगळी वितरण पद्धत निवडली जिच्यामुळे या खेळाच्या अनधिकृत प्रती काढता येत नाहीत.

कथारेषा

[संपादन]

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ची कथारेषा ही स्टारडॉकचे सीईओ ब्रॅड वार्डेल यांनी लिहिलेल्या लघुकथांच्या मालिकेवर आधारित आहे.

एक शक्तिशाली, अत्यंत प्रगत संस्कृतीने, जी केवळ प्रिकर्सर्स (इंग्लिश: Precursors) म्हणून लक्षात आहे, हजारो वर्षांपूर्वी आकाशगंगेत आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. जसजशा या आकाशगंगेत पसरलेल्या संघांनी आपापल्या प्राथमिक संस्कृत्या विकसित करणे सुरू केले तसतसे त्यांच्यात व प्रिकर्सर समाजात फूट पडू लागली. आर्नोर (इंग्लिश: Arnor) यांना त्या संस्कृत्यांचे प्रबोधन[श ३] करावेसे वाटते तर ड्रेड लॉर्ड्सना (इंग्लिश: Dread Lord) त्यांना नष्ट करायचे असते.

या भांडणाचे एका भीषण गृहयुद्धात रूपांतर होते. युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात ड्रेड लॉर्ड्‌स आर्नोरांचा नाश करण्याच्या अगदी जवळ पोचतात तितक्यात आर्नोर व ड्रेड लॉर्ड्‌स दोघेही रहस्यमयरीत्या गायब होतात.

काळांतराने आकाशात पसरलेल्या नवीन संस्कृतींनी स्वतः दीर्घिकेत [श ४] विस्तार करणे सुरू केले पण त्यांची प्रगती संथ होती. त्यांचा दीर्घिकेत विस्तार स्टारगेट्समुळे झाला. स्टारगेट तयार करायला महाग होती व ती याने फक्त दुसऱ्या स्टारगेटमधूनच बाहेर पडू शकत होती, जी इच्छित स्थळी प्रथम बनवावी लागत.

सर्वांत नवीन संस्कृती असलेल्या मानवी संस्कृतीने अर्सियन संस्कृतीशी संपर्क झाल्यावर स्टारगेट तयार करण्याचे ठरवले. मानवी शास्त्रज्ञांना स्टारगेटमागील तंत्रज्ञानामध्ये बदल केल्यावर लांब अंतरावरच्या ताऱ्यांपर्यंत जाण्यासाठीचे अंतराळयान बनवता येते हे लक्षात आले.

सर्व ताऱ्यांपर्यंत आता सहजपणे पोचणे शक्य झाल्याने मुख्य संस्कृत्यांनी दीर्घिका जिंकून घेणे सुरू केले. त्यांनी अनेक लढाऊ अंतराळयाने बांधून दीर्घिकेवर आक्रमण सुरू केले. जसे उदयोन्मुख संस्कृत्या युद्धासाठी सज्ज होऊ लागल्या तसे ड्रेड लॉर्ड्‌स परत आले.

खेळाडूला या खेळात मानवी हालचालींना मार्गदर्शन करून शत्रूंनी प्रिकर्सर तंत्रज्ञानाचा वापर करून मानवांना शोधण्याचा प्रयत्न रोखावा लागतो तसेच मुख्य शक्तींविरुद्ध दीर्घिकेत युद्ध लढावे लागते व नरसंहारक ड्रेड लॉर्ड्‌सच्या आक्रमणापासून बचाव करावा लागतो.

सुविधा व खेळाच्या संकल्पना

[संपादन]

हा खेळ "सॅंडबॉक्स" दीर्घिका खेळण्याच्या प्रकारावर खेळता येतो, जिथे ध्येय हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवणे हे असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रतिस्पर्ध्यांना चार मार्गांनी हरवता येते- सैन्याने जिंकणे, सांस्कृतिक वर्चस्व, वैश्विक मित्रत्व किंवा तंत्रज्ञान उच्चता. "सॅंडबॉक्स" प्रकारात खेळाडूला जसा खेळ हवा असेल तसा तो अनुकूलित करू शकतो. यामध्ये दीर्घिकेचा आकार, ग्रहांची लोकसंख्या तसेच प्रतिस्पध्याची शक्ति कमीजास्त करणे हेही आहेत. या खेळात त्याच्या शीर्षकाप्रमाणेच "ड्रेड लॉर्ड्‌स" देखील आहेत.

संस्कृत्या / स्पर्धा

[संपादन]

या खेळात १० पूर्वस्थित संस्कृत्या आहेत, व त्या खेळाडूला पूर्णपणे अनुकूलित स्पर्धा तयार करण्याची मुभा देतात. टेरन अलायन्स, यॉर कलेक्टिव्ह, ड्रेन्जिन एम्पायर, अल्टारियन रिपब्लिक, ड्राथ लीजन, टोरियन कॉन्फेडरेशन, डॉमिनियन ऑफ द कॉर्क्स, अर्सियन साम्राज्य, आयकॉनियन रिफज व थॅलन एम्पायर या त्या दहा संस्कृत्या आहे. लहान संस्कृत्यांच्या स्पर्धाही उपलब्ध आहेत (त्यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता कमी असते), त्यात उंदरांसारखे दिसणारे स्नेथी सुद्धा आहेत.

प्रत्येक पूर्वस्थित संस्कृतीत वेगवेगळी कृत्रिम बुद्धिमत्तेचे मिश्रण तसेच आधीपासूनचे विशिष्ट फायदे आहेत. टेरन (पृथीवरचे) हे उत्कृष्ट राजकारणी असतात तर ड्रेन्जिनांकडे उत्कृष्ट सैनिक व अंतराळयाने असतात, टोरियन्सची लोकसंख्या भराभर वाढते, तर यॉरकडे इमानी लोक असतात.

यान रचना

[संपादन]

मूळ गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स मध्ये चिकित्सकांच्या मतानुसार यान रचना सुविधा नव्हत्या. नवीन याने त्यांसंबंधित तंत्रज्ञानावर संशोधन केल्यावर उपलब्ध झाली. गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ मध्ये मात्र त्रिमितीय यान संपादक उपलब्ध आहे. तंत्रज्ञानातील शोधांमुळे खेळाडू त्यांना पाहिजे तशी अनुकूलित याने तयार करु शकतात. यानाच्या आक्रमण करण्याच्या क्षमता मात्र यामुळे कमीजास्त होत नाहीत.

प्रतिसाद

[संपादन]

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ला गेमस्पॉट, गेमस्पाय व आयजीएन यांकडून एडिटर्स चॉइस पुरस्कार मिळाला आहे. पहिल्या दोन आठवड्यांतच त्याच्या ५०,०००हून जास्त प्रती विकल्या गेल्या. गेमस्पॉटने इ.स. २००६चा सर्वोत्कृष्ट व्यूहतंत्र (स्ट्रॅटेजी) खेळ म्हणून घोषित केले.

स्टारडॉकचे सीईओ ब्रॅड वार्डेल यांच्या म्हणण्यानुसार मार्च, इ.स. २००८ पर्यंत या खेळाच्या ३,००,०००हून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.

बदल आणि विस्तारके

[संपादन]

स्टारडॉकने या खेळासाठी दोन मुख्य अद्ययावते प्रकाशित केली आहेत. ती डार्क अवतार व ट्वायलाइट ऑफ द आर्नोर ही आहेत.

डार्क अवतार

[संपादन]

स्टारडॉकने गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार हे विस्तारक फेब्रुवारी, इ.स. २००७ मध्ये प्रकाशित केले. त्यात अनेक सुविधा होत्या, जशा की:

  • दोन नवीन संस्कृत्या: कोराथ नामक ड्रेन्जिनची एक क्रूर उपशाखा व एक क्रिन नामक संस्कृती
  • नवीन मोहीम जिच्यात खेळाडू हा ड्रेन्जिनांचे नेतृत्व करतो
  • आपल्याला हवे तसे प्रतिस्पर्धी निवडण्याची मुभा

ट्वायलाइट ऑफ द आर्नोर

[संपादन]

स्टारडॉकने गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर हे विस्तारक एप्रिल २००८ मध्ये प्रकाशित केले. त्यात अनेक सुविधा होत्या, जशा की:

  • "टेरर स्टार्स" नावाच्या यानांनी सौरमालिका नष्ट करण्याची मुभा
  • नवीन नकाशा आकारामुळे खेळ महिनोन्महिने खेळण्याची मुभा

एन्डलेस युनिव्हर्स

[संपादन]

स्टारडॉकने गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: एन्डलेस युनिव्हर्स हे विस्तारक युरोपमध्ये सप्टेंबर २६, इ.स. २००८ रोजी प्रकाशित केले. त्यात डार्क अवतारट्वायलाईट ऑफ द आर्नोर या दोन्ही विस्तारकांचे एकत्रीकरण आहे. ते कॅलिप्सो मीडियाने प्रकाशित केले होते.

पारिभाषिक शब्दसूची

[संपादन]
  1. ^ विस्तारक - (इंग्लिश: expansion pack - एक्स्पांशन पॅक)
  2. ^ कृत्रिम बुद्धिमत्ता - (इंग्लिश: Artificial Intelligence - आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
  3. ^ प्रबोधन - (इंग्लिश: enlightenment - एनलाइटनमेंट)
  4. ^ दीर्घिका - (इंग्लिश: galaxy - गॅलेक्सी)

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "विकियावरील खेळाची माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy